She MARTS : महिलांच्या व्यवसायाला मिळालेली नवी बाजारपेठ

business varta

घरातून किंवा छोट्या दुकानातून व्यवसाय सुरू करणाऱ्या अनेक महिलांची कथा जवळपास सारखीच असते. मेहनत भरपूर असते. उत्पादन चांगल्या गुणवत्तेचं असतं. प्रामाणिकपणे काम केलं जातं. पण व्यवसाय वाढताना एक मोठा प्रश्न समोर येतो, माल तयार आहे, पण विक्री कुठे करायची?

ग्राहक नियमित मिळत नाहीत, दुकानाचं भाडं परवडत नाही, आणि मोठ्या ब्रँड्सशी स्पर्धा करणे कठीण वाटते. त्यामुळे अनेक चांगले व्यवसाय मर्यादितच राहतात. ही एखाद्या एकट्या उद्योजिकेची समस्या नाही; ही देशभरातील हजारो महिला उद्योजिकांची वास्तविकता आहे.

अशा पार्श्वभूमीवर She MARTS ही संकल्पना महत्त्वाची ठरते. सन 2026–27 च्या अर्थ संकल्पांत अर्थमंत्र्यांनी हा उपक्रम मांडला. या संकल्पनेचा विचार साधा आहे पण परिणामकारक आहे, स्वयं-सहायता गटांतील आणि स्थानिक महिला उद्योजिका एकत्र येऊन समुदायाच्या मालकीची किरकोळ दुकाने चालवतील.

याचा अर्थ असा की व्यवसायासाठी प्रत्येक महिलेला एकटीने संघर्ष करावा लागणार नाही. अनेक महिला एकत्र येऊन बाजारपेठ तयार करू शकतात. यामुळे खर्च कमी होतो, दुकान चालवणे सोपे होते आणि ग्राहकांमध्ये विश्वास निर्माण होतो. “महिलांनी चालवलेलं दुकान” ही स्वतःमध्ये एक वेगळी ओळख बनू शकते.

याचा फायदा स्पष्ट दिसतो. भाडे आणि इतर खर्च अनेक जणींमध्ये विभागले जातात. ग्राहकांना एका ठिकाणी विविध वस्तू मिळतात, त्यामुळे ते पुन्हा पुन्हा त्या दुकानात येतात. स्थानिक महिलांना त्यांच्या उत्पादनासाठी स्थानिक बाजारपेठ मिळते.

ही फक्त दुकान उघडण्याची कल्पना नाही. ही एक वेगळी व्यवसाय पद्धत आहे,  सहकार्यावर आधारित व्यवसाय मॉडेल.

याचं सोपं उदाहरण घेऊ. एखाद्या गावात किंवा शहराच्या वॉर्डमध्ये दहा महिला उद्योजिका आहेत असं समजा. कोणी पापड आणि लोणचं बनवते, कोणी मसाले तयार करते, कोणी सणासाठी सजावटीच्या वस्तू बनवते, तर कोणी कापडी पिशव्या किंवा हस्तकला तयार करते.

जर प्रत्येक जण वेगवेगळ्या ठिकाणी विक्री करत राहिली, तर ग्राहकांची ओळख मर्यादित राहते. लोकांना त्या उत्पादनांची माहिती कमी मिळते. पण या सर्वांनी मिळून एकच दुकान सुरू केलं, ज्याची ओळख असेल की “हे महिलांचं दुकान आहे,  महिलांसाठी आणि महिलांनी चालवलेलं”, तर परिस्थिती बदलू शकते.

ग्राहकाला एका ठिकाणी अनेक प्रकारची उत्पादने मिळतात. प्रत्येक उद्योजिकेचं उत्पादन जास्त लोकांपर्यंत पोहोचतं. विक्री वाढते आणि त्याचबरोबर आत्मविश्वासही वाढतो. या मॉडेलमध्ये कोणाचं नुकसान होत नाही; उलट सगळ्यांची वाढ होते.

She MARTS ही केवळ सरकारी घोषणा म्हणून पाहिली तर ती कागदावरच राहील. पण महिला उद्योजिकांनी आधीपासून तयारी सुरू केली तर ही संकल्पना प्रत्यक्षात यशस्वी होऊ शकते. सरकारकडून जागा, प्रशिक्षण, ब्रँडिंग आणि बाजारपेठेचा आधार मिळण्याची शक्यता असते. मात्र त्यासाठी स्थानिक पातळीवर एकजूट आणि नियोजन गरजेचं आहे.

आजपासून काही साध्या गोष्टी सुरू करता येतात. आपल्या परिसरातील पाच ते दहा महिला उद्योजिकांचा संपर्क ठेवणे, प्रत्येक जणी कोणते उत्पादन बनवते याची यादी तयार करणे, बचतगट किंवा ग्रामपंचायत बैठकीत एकत्र दुकान सुरू करण्याबद्दल चर्चा करणे, या छोट्या पावलांमधून मोठी संधी तयार होऊ शकते. आठवडी बाजार किंवा छोट्या प्रदर्शनांमध्ये एकत्र विक्रीचा प्रयोगही करता येतो.

सरकारी योजना, प्रशिक्षण कार्यक्रम आणि अशा उपक्रमांची माहिती ठेवत राहणंही महत्त्वाचं आहे. कारण संधी येण्याआधी तयारी असेल, तर त्याचा फायदा घेणं सोपं होतं.

व्यवसायाच्या जगात एक गोष्ट नेहमी खरी ठरते. एकट्याने चालल्यास वेग मिळतो, पण एकत्र चालल्यास दूरवर पोहोचता येतं. महिला उद्योजिकांसाठी आजची खरी गरज स्पर्धेपेक्षा सहकार्याची आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *